बारामतीत गटबाजी उफाळली; अजित पवारांच्या विश्‍वासू गुजरकडून राजीनाम्याची तयारी

बारामती – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत गटातटाचे राजकारण सर्वश्रुत आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गटातटाचे राजकारण आता चव्हाट्यावर आले असून, दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाल्लेकिल्ल्यातच निवडणुकी आधी गटबाजी उफाळून आल्याने अजित पवार ही कशी थोपवतात, हे पाहणे आता औत्सुक्‍याचे आहे.

अजित पवारांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी गटातटाच्या राजकारणामुळे अस्वस्थ असल्याची भावना व्यक्‍त केली असून, त्यांनी राष्ट्रवादीसह नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच योग्यवेळी वेगळा पर्याय निवडणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिलेत. त्यामुळे बारामतीत मिनी दादा म्हणून ओळखले जाणारे किरण गुजर खरंच राष्ट्रवादीतून बाहेर पडणार की, हे दबावतंत्र आहे, याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादीचा दुसरा गट सध्या वरचढ झाला असून नगरपालिकेत या गटाचा दबदबा असल्याने गुजरांचे या गटापुढे चालत नसल्याचे बोलले जात आहे.

तर पक्ष नेतृत्त्वही या गटबाजीकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना गुजर यांच्या मनात निर्माण झाल्याने त्यांनी दबावतंत्राचा वापार सुरू केला असल्याची चर्चा सध्या बारामतीत रंगली आहे. नगर पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत बेदखल केले जात असून नटराज नाट्यगृहाच्या संदर्भातील बाब न्यायप्रविष्ठ असताना राष्ट्रवादीचे काही नगरसेवक विरोधकांना फूस लावण्याचे षडयंत्र राबवत असल्याने अशा प्रकाराच्या राजकारणाचा विट आला आहे. याबाबत पक्ष नेतृत्वाला सांगूनही दखल घेतली जात नसल्याने आपण राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण राज्यात फिरत असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच मात्र, कार्यकर्त्यांची सुंदोपसुंदी वाढले आहे, याचा प्रत्यय वारंवार येत आहे.

किरण गुजर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी दर्शवल्यामुळे पुन्हा एकदा बारामती गटातटाचे आणि श्रेष्ठत्त्व वादाची लढाई सुरू झाली आहे. बारामतीत निर्माण झालेल्या या परिस्थितीचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतात, त्यामुळे अजित पवार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अस्वस्थता की दबावतंत्र…
नगर परिषदेतील गटबाजीला कंटाळून आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचे किरण गुजर यांनी जाहीर केले आहे. किरण गुजर यांच्यावर अशा प्रकारची वेळ का यावी, हा खरा प्रश्‍न आहे. नगरपरिषदेत गटबाजी होत असल्याचे आपण वारंवार नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, त्याबाबत दखल घेतली जात नाही. असे गुजर यांचे म्हणणे आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)