ठराविक प्रकाशकांच्याच नावे धनादेशासाठी शाळा समितीवर दबाव
पुणे – प्राथमिक शाळांमधील ग्रंथालयांमध्ये पुस्तक खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 75 हजार रुपयांचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. या समितीला पुस्तके खरेदी करण्याचे अधिकार आहेत. परंतु, जिल्ह्यातील काही गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून विशिष्ट प्रकाशकांचीच पुस्तके खरेदी करण्यासाठी व्यवस्थापन समितीकडून धनादेश घेतले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत.
जिल्ह्यातील 302 प्राथमिक शाळांमध्ये ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी व अनुषंगिक खर्चाकरिता 75 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामधून शाळा व्यवस्थापन समित्यांनी आवश्यक ती पुस्तके ग्रंथालयासाठी खरेदी करण्याच्या सूचना आहेत.
मात्र, काही गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीवर दबाव आणून विशिष्ट प्रकाशकांचीच पुस्तके खरेदी करावीत यासाठी संबंधित प्रकाशकांच्या नावे धनादेश घेत आहे. यासाठी मुख्याध्यापकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्याकडे आल्या आहेत.
पुस्तके खरेदी करण्याचे पूर्ण अधिकार असताना शाळा समित्यांच्या कामात हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.
विशिष्ट प्रकाशकांची पुस्तके खरेदी करायची असतील तर जिल्हा परिषद स्तरावरच निविदा काढून पुस्तकांची खरेदी करून ती पुस्तके ग्रंथालयाला वाटप करायला हवी होती. परंतु, प्रकाशकांकडून कमिशनच्या मोठ्या रकमा मिळणार असल्याने काही अधिकाऱ्यांकडून शिक्षक समितीवर दबाव ठाकण्याचा उद्योग केला जात आहे.
– देविदास दरेकर, गटनेते, शिवसेना