Satara: लावंघर उपसा सिंचन योजनेच्या कामांचे भूमिपूजन; ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते शुभारंभ
Satara उरमोडी प्रकल्पांतर्गत परळी गावाजवळ कृष्णा नदीची उपनदी असलेल्या उरमोडी नदीवर ९.९६ टीएमसी क्षमतेचे धरण २०१० मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून धरणात १०० टक्के पाणीसाठा होत आहे. उरमोडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणेनुसार सातारा तालुक्यातील ९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

Satara: पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लावंघर उपसा सिंचन योजनेच्या कामांचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेमुळे सातारा तालुक्यातील लावंघर, शिंदेवाडी, म्हसकरवाडी, करंजे, कुरुण, अंबवडे आणि परिसरातील वाड्यांमधील एकूण ३५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच प्रकल्पबाधित मौजे वेणेखोल येथील ८० प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी रोख अनुदान देण्याच्या निर्णयानुसार १९ कोटी ५२ लाख रुपयांच्या निधीचा धनादेशही यावेळी सुपूर्द करण्यात आला.
उरमोडी प्रकल्पांतर्गत परळी गावाजवळ कृष्णा नदीची उपनदी असलेल्या उरमोडी नदीवर ९.९६ टीएमसी क्षमतेचे धरण २०१० मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून धरणात १०० टक्के पाणीसाठा होत आहे. उरमोडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणेनुसार सातारा तालुक्यातील ९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. लावंघर उपसा सिंचन योजनेद्वारे सातारा तालुक्यातील सिंचनापासून वंचित असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. उरमोडी- कण्हेर जोड कालव्याच्या साखळी क्र. ०/६०० मीटर येथून १५४ मीटर उंचीवर प्रस्तावित वितरण कुंडामधून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी २५४ अश्वशक्तीचे दोन पंप (एकूण ५०८ अश्वशक्ती) बसविण्यात येणार आहेत. या योजनेची एकूण किंमत ३९.८२ कोटी रुपये असून योजना पूर्ण झाल्यानंतर या भागाला बारमाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
वेणेखोलच्या ८० प्रकल्पग्रस्तांना १९ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ
उरमोडी प्रकल्पांतर्गत मौजे वेणेखोल (ता. जि. सातारा) येथील पुनर्वसित गावठाणातील ८० खातेदारांनी मौजे म्हसवड (ता. माण) येथे मिळणाऱ्या पर्यायी जमिनीऐवजी एकरकमी रोख अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून पर्यायी जमिनीऐवजी एकरकमी रोख अनुदान देण्याच्या प्रस्तावास शासनाची दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यता मिळाली. त्यानुसार प्रकल्पग्रस्त खातेदारांना अनुदान वाटप करण्यासाठी १९.५२ कोटी रुपयांचा धनादेश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे वेणेखोल येथील ८० प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, उरमोडी प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल निकम, तहसीलदार समीर यादव, सहायक अभियंता श्रेणी १ प्रशांत शेडगे, उपविभागीय अभियंता अजय औताडे, सहायक अभियंता श्रेणी १ सोमेश्वर जरे, सहायक अभियंता श्रेणी २ सागर काटकर आदी उपस्थित होते.





