लंडन : आंतरराष्ट्रीय किर्तीची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला पॅलेस्टिनींसाठीच्या निदर्शनांना पाठिंबा दिल्याबद्दल आज लंडनमध्ये अटक करण्यात आली. तुरुंगात डांबल्याच्या निषेधार्थ उपोषण करणाऱ्या पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांना ग्रेटा थनबर्गने पाठिंबा दिला होता. प्रिझनर्स फॉर पॅलेस्टीन या गटाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग हातात पॅलेस्टीन ऍक्शन या संघटनेच्या समर्थनाचा फलक घेतलेली दिसते आहे. ब्रिटन सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवादी संघटना म्हणून पॅलेस्टाईन ऍक्शन या संघटनेवर बंदी घातली आहे. लंडन शहरामध्ये एका विमा कंपनीसमोर दोन कार्यकर्ते लाल रंगाच्या स्प्रेच्या भिंतींवर घोषणा रंगवत होते. या विमा कंपनीने इस्रायलशी संबंधित एल्बिट सिस्टीमला पाठिंबा दिला असल्याने ही निदर्शने केली जात असल्याचे प्रिझनर्स फॉर पॅलेस्टीनने म्हटले आहे. या गुन्हेगारी कृत्याबद्दल लंडन पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. बंदी घातलेल्या संघटनेचा फलक हाती घेतलेल्या आणखी एका महिलेला नंतर अटक करण्यात आल्याचे सांगितले गेले. ही महिला म्हणजे ग्रेटा थनबर्ग असल्याचे समजते आहे. ८ कार्यकर्त्यांचे उपोषण यापुर्वी केलेल्या निदर्शनांशी संबंधित आरोपांखाली तुरुंगात डांबलेल्या आणि जामीन नाकारलेल्या पॅलेस्टीन ऍक्शनच्या ८ सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यातील दोन कैदी गेल्या ५२ दिवसांपासून उपोषणावर आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे प्रिझनर्स फॉर पॅलेस्टीनने म्हटले आहे. ब्रिटन सरकारने कायदेशीर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. जामीन आणि कोठडीबाबतचा निर्णय न्यायालयच घेईल, असे सरकारने म्हटले आहे.