Green Bridge: आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे कौतुक!
Green Bridge : तुर्कीये येथील अंटाल्या येथे प्रकल्पाचे सादरीकरण - पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये पिंपरी चिंचवडचा पुढाकार

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत दखल घेण्यात आली आहे. तुर्कीये येथील अंटाल्या शहरातील अंटाल्या एक्स्पो सेंटर येथे ९ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची जागतिक स्तरावर दखल घेतली जाणे, ही पिंपरी चिंचवडसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
युरोपमध्ये सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्येही ‘हरित सेतू’ प्रकल्पाची चर्चा करण्यात आली. भारतामध्ये जगाला हेवा वाटावा असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवड महापालिकेनेही पुढाकार घेतल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरणपूरक प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाला मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल ही शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली नवी ओळख असून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीसाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे.
स्मार्ट सिटी आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले आहेत.
यामध्ये बापूसाहेब गायकवाड, सुनील पवार, अमित दीक्षित, स्वप्नील शिर्के, अनंत चिटके, प्रसाद देशमुख आदी अधिकाऱ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा विविध उपक्रमांमधील सहभागातून पिंपरी चिंचवड शहर पर्यावरणपूरक, शाश्वत आणि नावीन्यपूर्ण विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
‘पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये पर्यावरणाचा समतोल राखणे आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून उपक्रमांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे.’ – बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका





