सातारा – जिल्ह्यातील सैनिक सेवेची परंपरा व देशासाठी त्यागाची तयारी असलेल्या जवानांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्ह्यातील 309 सैनिक कुटुंबांनी त्यांच्या अडचणी एसपींच्यासमोर मांडल्या. तर एसपींनीही त्यातील काहीचा निपटारा जागेवरच केल्याने हा तक्रार निवारण दिन राज्याला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास सैनिकांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला. सैनिक हा कोणत्याही गोष्टींचा तमा न बाळगता सीमेवर लढत असतो. अशा वेळी त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे मनोधैर्य उंचावणे महत्त्वाचे ठरते. सातारा जिल्ह्याला तर सैन्याची मोठी परंपरा असल्याने गावागावांतील युवक सैन्यात आहेत. नेमका याच गोष्टीचा विचार करून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सैनिकांच्या कुटुंबांतील लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलीस परेड ग्राऊंडवर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यास सुरूवात केली. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्ह्यातील 309 सैनिक कुटुंबियांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. यातील काहीजणांच्या तक्रारी या पोलीस दलाशी संबंधीत असल्याने एसपींनी त्याचा निपटारा जागेवरच केल्याने सैनिक कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. तर इतर विभागांशी संबंधित तक्रारी बाबत एसपी त्या-त्या विभागाला पत्रव्यवहार करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, वीज वितरण, पोलीस दलाशी संबंधित तक्रारींचा ओघ जास्त असल्याचे दिसून आले. या तक्रार निवारण दिनाला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम तसेच सातारा, कराड, पाटण, दहिवडी, वाई, फलटण, कोरेगाव या उपविभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, महसूल, विधी अधिकारी उपस्थित होते.