नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐनवेळी तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे होणारी प्रवाशांची ओढाताण थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने आता आपल्या ‘चार्टिंग सिस्टम’मध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार, प्रवाशांना आता ट्रेन सुटण्याच्या १० तास आधीच त्यांची सीट कन्फर्म झाली आहे की नाही, याची माहिती मिळणार आहे. यामुळे ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंगवरच राहिले आहे, त्यांना प्रवासासाठी दुसरा पर्याय शोधण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. काय आहे नवीन चार्टिंग सिस्टम? रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याच्या वेळेत सुधारणा केली आहे. आता गाड्यांच्या वेळापत्रकानुसार चार्ट तयार करण्याचे नियम बनवले आहेत. त्यानुसार, सकाळच्या गाड्या (पहाटे ५:०१ ते दुपारी २:००) या गाड्यांचा चार्ट आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंत तयार केला जाईल. दुपार आणि रात्रीच्या गाड्या (दुपारी २:०१ ते रात्री ११:५९) या गाड्यांचा चार्ट प्रवासाच्या १० तास आधी तयार होईल. पहाटेच्या गाड्या (मध्यरात्री १२:०० ते पहाटे ५:००) या गाड्यांचा स्टेटस सुद्धा प्रवाशांना १० तास आधी एसएमएसद्वारे कळवला जाईल. इमर्जन्सी कोटा (Emergency Quota) आपत्कालीन कोट्याची फीडिंग कोणत्याही परिस्थितीत ट्रेन सुटण्यापूर्वी ८ तास आधी पूर्ण केली जाईल. ४ तासांचे टेन्शन संपले – जुलै २०२५ पूर्वी, प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या केवळ ४ तास आधी चार्ट तयार झाल्यावर सीटबाबत अपडेट (Status) समजत असे. ऐनवेळी तिकीट कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. जुलैमध्ये हा वेळ ८ तासांवर आणण्यात आला होता आणि आता तो सुधारून १० तास करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना नियोजन करण्यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे. एसएमएसद्वारे मिळणार माहिती – रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चार्ट तयार होताच प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर टेक्स्ट मेसेज (SMS) पाठवला जाईल. यामध्ये त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की वेटिंगवर आहे, याची स्पष्ट माहिती असेल. जर तिकीट वेटिंगवरच राहिले, तर प्रवासी बस, विमान किंवा इतर पर्यायांचा विचार वेळेत करू शकतील.