पिंपरी | गणेश विसर्जनासाठी महाालिकेचे चोख नियोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने चोख नियोजन केले असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध ठिकाणच्या नदीघाटांवर कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता जीवरक्षकांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे, गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, असे साकडे गणरायाला घातले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त व नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
दै. प्रभातच्या गणरायाची आरती केल्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाची गणेश विसर्जनाच्या नियोजनाची माहिती दिली.
यावेळी इंदलकर म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. गणेश विसर्जन करण्यासाठी येणारे नागरिक सर्व निर्माल्य निर्माल्य कुंडातच देत आहेत.
महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 16) संध्याकाळी 6 वाजेपासून भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि. 17) गणेश मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत दुपारी 3 वाजेपासून पिंपरी येथील कराची चौक तसेच चिंचवड येथील चाफेकर चौकातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे.
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण 15 विघटन केंद्रांची स्थापना देखील केली आहे. या विघटन केंद्रांवर प्रथमच गणेशमूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. या 15 विघटन केंद्रांच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनावेळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी.
विसर्जनाच्या दिवशी सर्व विसर्जन घाटांवर आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यावर महापालिकेने भर दिला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विसर्जनानंतर मूर्तीदान व संकलन केंद्रांची मोठ्या प्रमाणात निर्मितीही करण्यात आली आहे.
तरी नागरिकांनीही मूर्तीदान करून अथवा कृत्रिम विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.

