पुणे जिल्हा | खेडमध्ये महिलांचा प्रचंड निरुत्साह

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 1 लाख 83 हजार 57 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 16 हजार 131 मतदारांनी तर 1 लाख 69 हजार 567 महिला मतदारांपैकी 87 हजार 736 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 50 टक्के महिला वर्गाने मतदानाकडे पाठ फिरवली त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली तर यामुळे कोणत्या उमेदवाराला फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 13) झालेल्या मतदानातून मतपेटीत बंद झाले. त्यांचे भवितव्य येत्या 4 जून रोजी होणार्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. 32 पैकी 30 उमेदवार वगळता 2 उमेदवारांमध्ये चुरस आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे या दोघांमध्ये मोठी चुरस आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोसरी, हडपसर असा भाग येतो. भोसरी हडपसर या दोन ठिकाणी मतदार संख्या मोठी आहे. मतदानाची आकडेवारी पाहता खेड 57.81, आंबेगाव 61, जुन्नर 56.35, शिरूर 53.5, भोसरी 46.21 आणि हडपसर 45.36 टक्के मतदान झाले आहे. मतदान कमी झाल्याने याचा फटका नक्की कोणाला बसणार याची मतदारसंघात मोठी चर्चा सुरु आहे.
खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्यासह पदाधिकारी, भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांच्यासह आरपीआय आणि सहयोगी पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उतरले होते.
तर डॉ अमोल कोल्हे यांच्या बाजूकडून भाजपामधून बाहेर पडून शरद पवार गटात प्रवेश केलेले अतुल देशमुख व त्यांचे समर्थक, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर व पदाधिकारी, ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड, तालुका प्रमुख रामदास धनवटे, उप तालुका प्रमुख संजय घनवट व पदाधिकारी, युवा नेतृत्व सुधीर मुंगसे, बाबाजी काळे, काँग्रेसचे विजय डोळस यांनी जीवाचे रान करून कोल्हे यांचा प्रचार केला आहे.
बड्या सभांचा कोणाला फायदा?
खेड तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना आरपीआय सह इतर सहभागी पक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने होती. तर डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने काँग्रेस, ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट व सहयोगी पक्ष होते.
शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस हा बलाढ्य पक्ष आहे. त्याच्या बरोबरीने दोन्ही शिवसेना, भाजप ची ताकद आहे. आढळराव पाटील आणि डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ मोठ्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात झाल्या. या सभांचा किती परिणाम मतदानातून होणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
खासगी, सरकारी नोकरदारांची पाठ
खेड तालुक्यात यावेळी कमी मतदान झाले. महिला वर्गाने मतदानाकडे पाठ फिरवली आहे. मागील वेळी डॉ. अमोल कोल्हे यांना महिलांचे मोठे मतदान झाले होते. तरुण वर्ग त्यांच्याकडे होता. यावेळी हे चित्र कायम राहणार नाही, अशीही तालुक्यात चर्चा आहे. यावेळी खासगी, सरकारी नोकरदार वर्ग मतदानासाठी तुरळकपणे आला. त्यामुळे मतदान कमी झाले.
आदिवासी भागात मोदी नकोचा सूर
उमेदवारांचा पक्ष बदलाचा परिणाम यावेळी खेड तालुक्यात प्रकर्षाने जाणवला. पंतप्रधान मोदी नकोचा सूर ग्रामीण भागात विशेषतः आदिवाससी भागात होता. त्यामुळे आदिवासी भागाचे मतदान कोणाकडे जाणार याची गणिते पारावरच्या चर्चा मध्ये रंगली आहेत.
इतिहासात प्रथमच
खेड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आपसातील कट्टर राजकीय विरोधक एकत्र येवून ज्या-त्या नेत्यांचा प्रचार केल्याने निवडणुकीत रंग आला होता.





