पिंपरी | ‘मावळ’साठी महायुतीत रस्सीखेच !

लोणावळा, (वार्ताहर) – मुंबई-पुणे या महानगरांच्या मध्यभागी असलेला आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मावळ तालुका राजकीय दृष्टीकोनातून देखील तितकाच महत्वाचा आहे. विधानसभा निवडणूकांचा इतिहास बघता अलिकडील काळात हा मतदारसंघ भाजपाकडे राहिलेला दिसतो.
मात्र, २०१९ पासून येथील समीकरण बदलले आहे. सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यामुळे मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा आहे.
यामुळेच राज्य विधानसभेच्या निवडणूकीत मावळची जागा महायुतीत कुणाच्या वाट्याला येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
आमदार सुनील शेळके हे स्वतः प्रबळ दावेदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा या दोन्ही पक्षात मावळच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्यातील प्रमुख दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुतीच्या प्राथमिक सुत्रानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला ती जागा, असे ठरले आहे.
त्यानुसार मावळची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहून ती आमदार सुनील शेळके यांनाच मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.
परंतु शेळके यांच्या उमेदवारीला त्यांच्या पक्षातील एका गटाचा अर्थात बापूसाहेब भेगडे यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा विरोध असून बापूसाहेब भेगडे स्वतःही विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
सुनील शेळके यांच्या उमेदवारी समोर बापूसाहेब भेगडे यांसह भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी आमदार स्व. दिगंबर भेगडे यांचे पुतणे रविंद्र भेगडे यांचेही आव्हान आहे. कारण रविंद्र भेगडे यांनी देखील उमेदवारीसाठी दंड थोपटले आहे.
सातत्याने पत्रकार परिषदा घेत आणि संवाद बैठकातून त्यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली असून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे असलेल्या उमेदवारांच्या रेट्यामुळे सध्या मावळ विधानसभा मतदारसंघ महायुतीत कळीचा मुद्दा ठरताना दिसत आहे.
सुनील शेळके यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र उमेदवारी फिक्स असल्याचे समजून कामाला सुरुवात केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
मविआची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
जोपर्यंत महायुतीकडून मावळच्या उमेदवाराची घोषणा होत नाही, तोपर्यंत महाविकासआघाडी आपले पत्ते उघड नसल्याची शक्यता दिसत आहे. आघाडीत काँग्रेस पक्षाकडून सातजण विधानसभेसाठी इच्छूक आहेत.
तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही काहीजण इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाखती पक्षाने घेतल्या आहेत. परंतु समोरुन महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकासआघाडी आपला उमेदवार जाहीर करेल असे, वातावरण दिसत आहे. यात आघाडीकडून घटक पक्षातील उमेदवार असणार, की महायुतीतील नाराज किंवा आयात उमेदवार उभा राहणार, हे लवकरच समजेल.
२०१९ च्या निवडणूकीची आठवण…
२०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत सुनील शेळके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपातील काही नेत्यांचा आग्रह होता. मात्र त्यावेळी बाळा भेगडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.
बाळा भेगडे यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार याची खात्री पवारांना होती. त्यांनी या संधीचा फायदा उठवत विविध उपक्रमांच्या माध्यमातून तयार झालेले नेतृत्व हेरून सुनील शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली.
त्यावेळी झालेल्या निवडणूकीत सुनील शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांचा तब्बल ९३,९४२ मताधिक्याने पराभव केला. तेव्हापासून मावळ मतदारसंघातील राजकीय चित्र बदलून गेले.





