रायगड : रायगडमधील रोह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या २ वर्षांच्या नातवाईसहीत इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोहा शहरात आज सकाळी आजीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे खळबळ उडाली आहे. रोहा-कोलाड रस्त्यावरील ओम चेंबर बिल्डिंगच्या टेरेसवरून ५२ वर्षीय आजीने त्यांच्या नातवासह उडी मारली. उर्मिला कोरे असं उडी मारलेल्या आजीचे नाव आहे. तर वेदांत विवेक बोगडे असं नातवाचे नाव आहे. या घटनेत उर्मिला कोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या जखमी नातवाला तातडीने उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं रोह्यात एकच खळबळ उडाली असून या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं यामागील गूढ वाढलं आहे. नेमकं काय घडलं? उर्मिला कोरे यांनी बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमार उर्मिला त्यांच्या नातवाला घेऊन गच्चीवर गेल्या आणि त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली. या घटनेत नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अधिकचा तपास रोहा पोलीस करीत आहेत. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नातवाच्या आजाराला कंटाळून आजीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस कोरे कुटुंबियांबरोबरच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या उर्मिला यांच्या ओळखीतील लोकांकडे चौकशी करत आहेत.