पुणे – सतिशशेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दि. १५ जुलै रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, युवतींसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी असून जवळपास ५००० पेक्षा अधिक जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ३५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. इयत्ता पाचवी ते पदवीधरपर्यंत शिक्षण असणाऱ्या युवक-युवतींना ही या नोकरी महोत्सवात नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या महोत्सवाचे आयोजन बिबबेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन अशी या महोत्सवाची वेळ असणार आहे. याबाबत माहिती देताना आ. मिसाळ म्हणाल्या, नोकरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पण ‘योग्य व्यक्तिला, योग्य नोकरी’ मिळणे आवश्यक असून हाच नोकरी महोत्सव आयोजित करण्याचा हेतू आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना नोकरी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इच्छुक युवक-युवतींसाठी नोकरीचे मुबलक पर्याय महोत्सवात उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन नोंदणीसाठी madhurimisal.jobfairindia.in यावर संपर्क साधता येईल.