ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय ओझरच्या १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित जिल्हा पातळीवरील हॉलीबॉल स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी पुरंदर हायस्कूल, सासवड येथे पार पडल्या.
चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये सेमीफायनल मध्ये बारामती तर फायनल मध्ये दौंड अशा मातब्बर संघांवर मात करून विघ्नहर विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांनी विजेतेपद पटकावले आणि विभागीय पातळीवर दिमाखात प्रवेश मिळविला आहे.
तसेच नुकत्याच सासवड येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत विघ्नहर विद्यालय ओझरने १७ वर्ष वयोगट मुले, मुली उपविजेतेपद पटकाविले होते. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गणेश राऊत सर यांनी मार्गदर्शन केले आहे.
मार्गदर्शक आणि संघातील खेळाडूंचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व विश्वस्त, दोन्ही गावचे सरपंच, सदस्य, समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.