Gram Panchayat Election: राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या काळात संपत आहे, तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरु होणार असून ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना दि.७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यात – ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार असून, त्याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील. तलाठी आणि ग्रामसेवक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला मान्यता देईल, असे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागच्या सह सचिव वर्षा भरोसे यांनी जारी केले आहेत. अंतिम प्रभाग रचना होणार ४मे रोजी प्रसिध्द – ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागवण्यासाठी ७ एप्रिल २०२६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांना आपल्या हरकती १३ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदवता येतील.प्राप्त हरकतींवर २१ एप्रिल २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून २८ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल. तर दि.४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिध्द करणार आहे. हेही वाचा – अजित पवार विमान अपघाताचा धक्कादायक खुलासा ते शेतीसाठी ‘एआय’ क्रांती; वाचा आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या!