ग्रामपंचायत निवडणूक: शिरूरमध्ये घड्याळ की कमळ?, आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निमोणे – शिरूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तासच उरले असून अटीतटीच्या या लढतीत कोण विजयी होणार? या विचाराने अनेक उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. शिरुर तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक सुरु राहणार की, भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलणार याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

ही निवडणूक म्हणजे विधानसभेनंतर आजी- माजी आमदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असून, याच निवडणुकीवर तालुक्‍यातील इतर संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबुन असणार आहे. शिरुर तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांच्या निमोणे गावात ग्रामपंचायतमध्ये एकूण 13 सदस्य असून 5 नंबर वॉर्डमधील 1 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीला 12 जागांसाठी एकूण 39 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे निवडणुकीला मोठी रंगत निर्माण झाली होती.

निमोणे येथे एकूण 5 वॉर्ड असून, वॉर्ड क्र 1 मध्ये विद्यमान आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक संजय काळे आणि माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक संतोष काळे यांच्यात थेट समोरासमोर लढत आहे. या दोघांपैकी मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्‍याच ठरणार आहे.

निमोणे गावात ग्रामपंचायत निवडणुकीला राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच लढत होत असून, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. तसेच शिंदोडी येथे भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दौलत खेडकर, दौलत शितोळे यांच्या जय हनुमान पॅनलच्या विरोधात विद्यमान आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ वाळुंज यांच्या पांडुरंग कृपा पॅनलचे उमेदवार उभे आहेत.

शिंदोडी येथे ग्रामपंचायतच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार उभे असून शिंदोडीत सलग 15 वर्षे दौलत शितोळे यांची ग्रामपंचायतवर सत्ता असून, शिंदोडीत मतदार कोणाला कौल देतात, हे पाहण औत्सुक्‍याच ठरणार आहे.

शिवसेनेला कौल मिळणार का?
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचं तिघांच सरकार असलं तरीही शिरुर तालुक्‍यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कायमच धुसफूस सुरु असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा अनेक ठिकाणी शिवसेनेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यामुळे शिरुर तालुक्‍यातील 62 ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदार कौल देणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.