पुण्यातील मतदार ठरविणार ‘पदवीधर’चा आमदार

महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्षात थेट लढत, “मनसे’ ठरणार निर्णायक

पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. पहिल्यांदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी थेट निवडणूक होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पदवीधरसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख या दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

पदवीधर मतदारसंघातून मागील वेळी भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र हा या निवडणुकीसाठी मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीचे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे, यामुळे या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीसाठी लावली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पदवीधर मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. तर, भाजपला आपला मतदारसंघाचा गड राखण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असल्याने सर्व राजकीय पक्षांना पुणे जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार असून पुणे जिल्हा हाच निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरणार आहे. तर, या निवडणुकीत पुणे हा टर्निंग पॉईंट असणार आहे. पुण्याच्या काही भागात मनसेचीही ताकद आहे. तसेच, मनसेच्या उमेदवारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

पुणे जिल्ह्याचा विचार करता जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपची सत्ता आहे. तर, बहुतेक पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील ही स्थिती पाहता महाविकास आघाडी आणि भाजप हे दोन्ही पक्ष ताकदीने प्रचार करत आहे. मतदानासाठी अवघे 10 दिवस उरले असल्याने तसेच पाच जिल्ह्यांचा विस्तार पाहता सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना तसेच उमेदवारांना पायाला भिंगरी लावून फिरावे लागत आहे.

यामुळे राष्ट्रवादीकडून लाड यांना उमेदवारी…
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा सांगली जिल्ह्यातील लाड यांना उमेदवारी जाहीर केली. मागील पदवीधर निवडणुकीवेळी लाड यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते विभाजनाचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांना बसला आणि सारंग पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा ही निवडणूक जिंकायचीच या इर्षेने राष्ट्रवादी कॉंग्रेसने लाड यांना उमेदवारी दिली असून सर्व नेते आता प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.

पदवीधर मतदारसंघ आणि मतदार…
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 4 लाख 26 हजार मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी 72 हजार 545 मतदार आहेत. यामध्ये पदवीधरसाठी पुणे जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 611 मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी पुणे जिल्ह्यात 32 हजार 201 इतके मतदार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यावरच दोन्ही उमेदवारांचे लक्ष असून विजयासाठी निर्णायक ठरणारी मते मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

…संख्याबळ वाढणार
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी ठरल्यास विधानपरिषदेमधील आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे. महाविकास आघाडीतील आमदारांची संख्या या मतदारसंघात जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरली आहे. दुसरीकडे भाजपने सुद्धा विजयासाठी रणनीती आखली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पुण्यात येऊन जबाबदारी वाटून घेत असून पक्षाच्या नेत्यांचा पुणे दौरा सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.