कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥

एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड
आळंदी –
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर
तया नमस्कार वारंवार ।
न पाहे यातीकुळांचा विचार
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥
भलतिया भावें शरण जातां भेटी
पाडितसे तुटी जन्मव्याधी ।
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥
कृपाळू, उदार, भक्त करुणाकर, अनाथाची माय, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली… अशा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना नमस्कार करण्यासाठी त्यांचे दर्शनसाठी, अनुपम्य अलौकिक कार्तिकी वारी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक वारकरी देश-राज्याच्या कानाकोपर्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले होते.
दशमीच्या दिवशी सायंकाळपासून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत पोहोचत होते. एकादशीच्या दिवशी पहाटेपासून भाविक वारकरी पवित्र इंद्रायणीचे स्नान करून नगरप्रदक्षिणा करत होते. हातामध्ये उंच उंच वारकरी पताका, गळ्यात टाळ, वीणा मृदंग घेऊन त्याच्या तालावर गोड अभंग गात, ज्ञानोबा… तुकारामचा गजर करत शेकडो दिंड्यानी नगरप्रदक्षिणा केली.
इंद्रायणी घाटावर येताच वारकर्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारल्याचे दिसून येत होते. 80 -90 वर्षांचे वारकरी तरुणांना लाजवेल अशा अवस्थेत देहभान विसरून हरीनामात तल्लीन झाले होते. फुगड्यांचा फेर, पाऊली असे विविध वारकरी खेळ इंद्रायणी घाटावर रंगले होते. छोटे बालक ते शंभरी पार केलेले अशा सर्वांनी कार्तिकी वारी सोहळ्याचा आनंद घेतला.
दशमीच्या रात्री 12 नंतर एकादशीच्या उत्सवाला सुरुवात होते. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या सेवकांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. सनई चौघड्यांच्या मंगल स्वराने मंदिरातील वातावरण अधिक भक्तिमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता.
घंटानाद झाल्यानंतर माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून साडेबारा ते दीडपर्यंत संजीवन समाधीवर 11 ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती करण्यात आली. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरीमुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. आरती संपन्न होऊन देवस्थानच्या वतीने उपस्थितीत मान्यवर, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुर्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुर्हाडे, योगेश आरु, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, डी. डी. भोसले पाटील, अजित वडगावकर, राहुल चव्हाण, प्रशांत कुर्हाडे, आदित्य घुंडरे, सचिन गिलबिले, सागर भोसले, साहेबराव कुर्हाडे, प्रदिप बवले, ज्ञानेश्वर रायकर, प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास महापुजेचा मान
एकादशीच्या महापुजेला दर्शनबारीत उभे असलेल्या दाम्पत्याला मान देण्याची परंपरा आहे. त्यानुसार दर्शन बारीतील पहिले दाम्पत्य अशोक मनोहर लोखंडे, त्यांच्या पत्नी अलका अशोक लोखंडे (रा. शिंपी टाकळी, ता. निफाड, जि. नाशिक) यांना मान मिळाला. महापुजेनंतर लोखंडे दांपत्याला आळंदी देवस्थानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा
दुपारी 1 वाजताच्या दरम्यान माउलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होती. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन करून तसेच डोळ्यात भरून दर्शन घेतले.
इंद्रायणी घाटावर वारकर्यांचे विविध खेळ
एकादशीच्या दिवशी सर्व दिंड्या नगरप्रदक्षिणा करत असतात. प्रदक्षिणा करून इंद्रायणी घाटावर आल्यावर दिंडीतील भाविकांचा उत्साह दुनावत होता. येथे दिंडीतील महिला पुरुष, फुगडी, पाऊली खेळून आनंद साजरा करत होते.
द्वादशीला रथोत्सव
कार्तिक वद्य द्वादशी, बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 ते 3:30 पवमान अभिषेक व दुधारती, पहाटे 3:30 ते 4 प्रांतअधिकारी खेड यांचे हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे 3 ते 6 मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. 15 यांचेतर्फे काकडा भजन सेवा. सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12 ते 12. 30 महानैवेद्य, दुपारी 4 ते 7 रथोत्सव संपन्न होणार आहे. दुपारी 4 ते 6 वीणा मंडपात ह भ प हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. साडेआठ ते नऊ धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 11 ते 12 पास धारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप- वीणा मंडप, श्रींच्या गाभार्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप, असे कार्यक्रम होणार आहेत.





