satara | सरकारला म. फुलेंच्या शिल्पसृष्टीची ॲलर्जी !

सातारा, ( प्रतिनिधी ) -नायगाव येथे काही वर्षापूर्वी शिल्पसृष्टी साकारुन सावित्रीमाईंच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचे काम शासनाने केले. परतु, जोतीराव फुले यांच्या कटगुण या कुलभूमीत मात्र शिल्पसृष्टी अद्यापही साकारली नाही.
वास्तविक या शिल्पसृष्टीचा मुद्दा जिल्हा प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यंत वारंवार समोर आणला असताना ऐन अधिवेशन काळात यासंबधी सातारा जिल्ह्यातील एकही लोकप्रातिनिधी सभागृहात बोलत नाही, हा म. फुलें यांचा अवमान आहे.
शासनही याबाबत भूमिका घेत नसल्याने महात्मा फुलेंचे यांना ॲलर्जी आहे काय ? असा प्रश्नांकित आरोप साहित्यिक अरुण जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
अरुण जावळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, ११ ते १२ वर्षापूर्वी कटगुणच्या शिल्पसृष्टीबाबत प्रशासन स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हापरिषदेत ठरावही मंजूर झाला. मंत्रालयस्तरावरही हालचाली झाल्या. तथापि या शिल्पसृष्टीला मूर्तरुप आले नाही.
खरंतर, ही बाब खेदजनक आहे. ज्या फुले दांम्पत्याचा वारसा हा सातारा जिल्हा मोठ्या अभिमानाने महाराष्ट्रभर सांगतो, त्या जिल्ह्यातील चक्क जोतीरावांच्या कुलभूमीत शिल्पसृष्टी होत नाही, हा एका अर्थाने जोतीरावांचा घोर अवमान आहे.
यापुढे तरी शासनाने शिल्पसृष्टीकडे दुर्लक्ष करू नये. दोन कोटींची तरतूद करून शिल्पसृष्टी लवकर कशी साकारता येईल याबाबत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी गाभीर्याने विचार करावा. सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी यासाठी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने एका महात्म्याला अभिवादन करावे.
फुले दांम्पत्याचे ‘क्रांतिकारकत्व’ समग्र समाज परिवर्तनाच्या चळवळीला विशिष्ट आयाम देणारे ठरले. सामाजिक उत्थानाच्या कार्यामुळे फुले दांम्पत्याचा आदर केवळ महाराष्ट्रच करत नाही, तर देशभर केला जातो. पाच सहा वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने जोतीराव फुले यांना भारतरत्न बहुमान मिळावा यासाठी केंद्र सरकारजवळ आग्रह धरला होता.
सरकारचा हा आग्रह स्वागतार्ह असला तरी फुले यांना अद्याप भारतरत्न दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक भारतरत्न मिळण्याबरोबरच कूलभूमीत जोतीरावांची शिल्पसृष्टी साकारावी यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी.
शिल्पसृष्टीबाबत ठोस निर्णय व्हावा
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पत्रव्यवहार झालाय, मात्र त्यांच्याकडून अद्यापही सकारात्मक हालचाल होत नाही. प्रशासनही कानाडोळा करत आहे. लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीचा – विचारदृष्टीचा अभाव आणि शिल्पसृष्टीबाबत कमालीची उदासिनता यामुळे प्रशाससही हालत नाही.
किमान या अधिवेशनात तरी शिल्पसृष्टीबाबत ठोस निर्णय व्हावा अन्यथा जिल्ह्यातील फुलेवादी विचारप्रवर्तकांडून सत्याग्रहाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा साहित्यिक अरुण जावळे यांनी दिला आहे.





