Govind Mohan : केंद्रीय दलांचे जखमी जवान सेवेत राहणार कायम; केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) अधिकारी आणि जवानांना मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले जाणार आहे. माेहिमांवेळी शरीराचे अवयव गमावणाऱ्या, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या अधिकारी-जवानांना सेवेत कायम ठेवले जाईल. त्यांना ठरलेले वेतन मिळेल. तसेच, एकरकमी आर्थिक पॅकेजही उपलब्ध होईल.
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी संबंधित माहिती दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ८७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. माेहिमांवेळी शरीराचे अवयव गमावणाऱ्या, अपंगत्व आलेल्या अधिकारी-जवानांना सेवेतून न काढण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. तशा अधिकारी आणि जवानांना संबंधित दलांच्या विशिष्ट विभागांमध्ये रूजू केले जाईल.
सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना नियमित वेतन, भत्ते मिळण्याची निश्चिती केली जाईल. त्यांना सन्मानाने सेवा बजावता येऊ शकेल. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची व्यवस्थाही केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संबंधित निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या उद्देशातून एक समिती स्थापण्यात आली आहे. त्या समितीच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत निर्णयाशी संबंधित योजना जाहीर केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.




