वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन नवे केंद्रीय गृहसचिव; 22 ऑगस्टला स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) वरिष्ठ अधिकारी गोविंद मोहन यांची बुधवारी अजय कुमार भल्ला यांच्या जागी केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी गोलिंद हे सध्याचे सचिव भल्ला यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदाची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती एका अधिकृत आदेशात देण्यात आली आहे. गोविंद हे सध्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आहेत. ते गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यभार स्वीकारतील. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोहन यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
22 ऑगस्टला स्वीकारणार पदभार –
“मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गोविंद मोहन, IAS (सिक्कीम: 1989), सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, यांची गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे,” अधिकृत आदेशात म्हटले आहे. “ अजय कुमार भल्ला IAS (आसाम-मेघालय: 1984) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मोहन, त्यांच्या जागी 22.08.2024 रोजी गृह मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारतील,” असे आदेशात म्हटले आहे. मोहन यांनी BHU मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे आणि ऑक्टोबर 2021 पासून त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक सचिव म्हणून काम केले आहे. यापूर्वीही त्यांनी दोनदा गृहमंत्रालयात काम केले आहे.
कॅबिनेट सचिवांचीही नियुक्ती-
याआधी शनिवारी केंद्राने कॅबिनेट सचिव पदासाठी वित्त सचिव टी.व्ही.सोमनाथन यांच्या नावाला मंजुरी दिली होती. या पदावरील सोमनाथन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल आणि ते विद्यमान कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची जागा घेतील, ज्यांचा या पदावरील पाच वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांचा असेल.

