Indapur : कृषी यांत्रिकीकरणाला शासनाचे बळ
Indapur : ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध कृषी अवजारे, किसान ड्रोन आणि कम्बाईन हार्वेस्टर अशा आधुनिक साधनांच्या खरेदीसाठी मिळालेल्या या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

इंदापूर : शेतीतील पारंपरिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच शेतीची कामे अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत तब्बल ५ हजार ७९५ शेतकऱ्यांना ६५ कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध कृषी अवजारे, किसान ड्रोन आणि कम्बाईन हार्वेस्टर अशा आधुनिक साधनांच्या खरेदीसाठी मिळालेल्या या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना कमी वेळेत, कमी खर्चात अधिक उत्पादन घेता यावे, यासाठी आधुनिक कृषी यंत्रे आणि अवजारांची उपलब्धता महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांची मेहनत आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासन कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देत आहे. या योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १ हजार ८८९ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी, ३६४ शेतकऱ्यांना पॉवर टिलरसाठी, तर सर्वाधिक २ हजार ९०२ शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रे व अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय ६०० शेतकऱ्यांना कृषी अवजारे बँक उभारण्यासाठी, १३ शेतकऱ्यांना किसान ड्रोनसाठी आणि २७ शेतकऱ्यांना कम्बाईन हार्वेस्टरसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच्या आधारे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची निवड झाल्यानंतर पूर्वसंमती घेऊन संबंधित कृषी यंत्रांची खरेदी करावी लागते. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाते.
ठळक आकडेवारी
ट्रॅक्टर – १,८८९
पॉवर टिलर – ३६४
कृषी यंत्रे व अवजारे – २,९०२
कृषी अवजारे बँक – ६००
किसान ड्रोन – १३
कम्बाईन हार्वेस्टर – २७
एकूण शेतकरी – ५,७९५
एकूण अनुदान – ६५.११ कोटी





