केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली: चीनने सीमावर्ती भागात भारताच्या विरोधात जी आगळीक चालवली आहे त्याच्या विरोधात चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे अभियान सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या कामातूनही चिनी कंपन्यांना हद्दपार केले जाईल. अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. छोटे, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही चिनी गुंतवणुकदरांना संधी मिळणार नाही याची दक्षता सरकार घेईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, चिनी कंपन्यांनी अन्य कंपन्यांशी सहकार्य करून भारतात गुंतवणुकीचा प्रयत्न केला तरी आम्ही तो नाकाम करू. चिनी कंपन्यांबरोबरच्या कोणत्याही जॉईन्ट व्हेंचरलाही अनुमती दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितले. या संबंधातील धोरण लवकरच जाहीर केले जाईल आणि भारतीय कंपन्यांना अधिक मोकळीक दिली जाईल असे ते म्हणाले.
सध्या जारी केलेल्या निवादांमध्येच ही दक्षता घेतली जाईल असे ते म्हणाले. भारतीय कंपन्यांना अधिक मोकळीक देण्याची सुचना आपण हायवे सेक्रेटरी आणि नॅशनल हायवे ऍथॉरिटीच्या अध्यक्षांना केली आहे असेही गडकरी यांनी या मुलाखतीत सांगितले.
भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रकल्पांचे कंत्राट मिळवण्यासाठी विदेशी कंपन्यांबरोबर करार करावा लागू नये याची दक्षता घेण्यासही संबंधीतांना सांगण्यात आले आहे असे ते म्हणाले. भारत सरकार विदेशी गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देणार असले तरी त्यात चिनी कंपन्यांचा सहभाग नसेल याची काळजी यापुढे घेतली जाईल.