सरकारी तिजोरी रिकामी केली; रेखा गुप्ता यांचे आपवर टीकास्त्र

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील महिलांसाठीची अर्थसहाय्य योजना भाजपचे नवे सरकार केव्हा लागू करणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. अशात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मागील आप सरकारवर सरकारी तिजोरी रिकामी केल्याचा ठपका ठेवला.
दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, रविवारी सत्ताधारी भाजप आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना महिला समृद्धी योजनेची अंमलबजावणी केव्हापासून होणार, असा प्रश्न विचारण्यात आला. सरकार स्थापनेनंतर आम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिल्लीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी सरकारी तिजोरी रिकामी असल्याचे आम्हाला समजले, असे उत्तर गुप्ता यांनी दिले. अर्थात, व्यवस्थित नियोजन करून संबंधित योजना लागू करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी प्रमुख पक्षांनी महिला मतदारांना खुष करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्याची आश्वासने दिली. त्यामध्ये भाजपही मागे राहिला नाही. त्या पक्षाने महिला समृद्धी योजना अंमलात आणण्याची गॅरंटी दिली. त्या आश्वासनानुसार महिलांना दरमहा प्रत्येकी २ हजार ५०० रूपये आर्थिक मदत देण्याचे सूतोवाच करण्यात आले.





