सरकारने राज्याचा खेळखंडोबा केला : पवार

आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन : राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा नगरमध्ये दाखल

नगर – राज्य सरकार सर्वच घटकांवर अपयशी ठरले आहे. पाच वर्षात राज्यावर 5 लाख कोटींचे कर्ज केले असून, डोक्‍यावर कर्ज घेऊनच मूल जन्माला येत आहे. सरकारने राज्याचा खेळखंडोबा केला असून आर्थिक संकटात लोटले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बुधवार (दि.7) रोजी नगरमध्ये आल्यानंतर शहरातील चौपाटी कारंजा येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, फौजिय खान, विद्या चव्हाण, अंकुश काकडे, आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनशाम शेलार, प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, किरण काळे, मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, रेश्‍मा आठरे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नगर शहरासाठी साडेतीनशे कोटी देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यातील एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. अशाच प्रकारचे आश्‍वासन कल्याण डोंबवलीत दिले होते. भाजपकडून निवडणुकीत आश्‍वासनांचे मोठे गाजर दाखविले जाते. आता, गाजरांनाही लाज वाटत असावी, अशी टीका अजित पवार यांनी केली.
सरकारने पाच वर्षात काय विकास केला हे दाखवावे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यात खेळखंडोबा झाला आहे. पाच वर्षात 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुली, उद्योगपती आत्महत्या करीत आहेत.

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हे अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून यात्रा काढण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव आम्ही मान्य केला आहे. मात्र, आता ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्यात बदल करून आघाडीचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी केले. भाजप सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन-तीन महिन्यात स्थानिकांना 75 टक्के नोकरीचे आरक्षण दिले जाईल. तसेच सरकारी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी नोकरभरती केली जाईल, असे आश्‍वासन पवार यांनी दिले.

खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. नगरमध्ये पक्षाला घरघर लागल्याची चर्चा होती. पण ही चर्चा खोडून काढल्याचे सिध्द झाले आहे. आघाडीच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे असल्याचे भाजप सांगत होते. सरकार तुमचे होते, पुरावे होते तर कारवाई का केली नाही, असा सवाल करून गाडीभर पुरावे आता भिंगाने शोधावे लागतील, असा टोला कोल्हे यांनी लगावला. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या.

महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही, असे परखड मत त्यांनी मांडले. आ. जगताप म्हणाले की, आतापर्यंत शहरात राजकारण विकासाचे झाले नाही. विरोधकांनी दुसऱ्याला नावे ठेवण्यातच धन्यता मानली. मला नगरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल्याने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी नगरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. आपण मात्र आजवर विकासाचे राजकारण केले आहे. आटीपार्क सुरू करून आपण हे सिध्द करून दाखविले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)