शासकीय विश्रामगृह बनले मदिरालय!

संगमेनर – संगमनेरचे शासकीय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनलाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या शासकीय विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे. विश्रामगृहात येणारे शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्तेचे आणि इतरही लोक मद्यपार्टी करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विश्रामगृह शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी मदिरालये बनत चालल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह संगमनेर शहरात आहे. आता विश्रामगृह मदिरालय बनत चाललं आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विश्रामगृहात आणि परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आहे. एखाद्या बारसमोर नसतील इतक्या बाटल्या शासकीय विश्रामगृह परिसरात आहेत. उच्च अधिकारी असो की राजकीय पक्षांचे पदाधिकारी थांबल्यावर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि येथील काही कर्मचारी त्यांची चांगलीच बडदास्त ठेवताना दिसत आहेत. यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे याठिकाणी काही खासगी लोकांच्या जेवणावळी नेहमी होत असतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येते. विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी कामानिमित्त येत असतात. या इमारतीच्या आवारात अनेक लोक येतात थोडा वेळासाठी खोलीत बसतात, काही जण मीटिंगसाठी म्हणून लोकांना गोळा करून गप्पा मारत बसतात. तर काही जण बाटल्या फोडून खोलीच्या मागच्या बाजूने खाली टाकून देत असल्याने या बाटलीचे खरे तळीराम कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
व्यसनामुळे राज्यात अनेक संसार उद्धवस्त होण्याच्या घटना घडताना दिसतात. असे असताना शासकीय इमारतीतील भोंगळ कारभारामुळे दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे. या तळीरामांचा शोध घेऊन योग्य कारवाई होईल का? हा मोठा प्रश्नच आहे. या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही. मात्र शासकीय विश्रामगृहातील काही कर्मचारीच त्या तळीरामांना खतपाणी घालत असल्याचे बोलले जाते.





