संगमनेर – कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. या खटल्यातील इंदोरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलाचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने ऍड. कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या खटल्यासाठी कोणाची नियुक्ती होते, तसेच बुधवारी (दि. 25) होत असलेल्या सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून गर्भलिंग तपासणी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या प्रोसेस इश्यूच्या आदेशाला इंदोरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून, त्यावर पुढील सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदोरीकरांतर्फे ऍड. के. डी. धुमाळ, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रंजना गवांदे बाजू मांडत आहेत.
सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मागील तारखेला हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे सुनावणी 25 नोव्हेंबरला ठेवण्यात आली. यातील सरकारी वकिलांच्या भावाविरुद्ध संगमनेरच्या न्यायालयातच एक खटला सुरू आहे. त्यामध्ये इंदोरीकरांचे वकील धुमाळ हेच बाजू मांडत आहेत. त्यावरून चर्चा आणि आरोप सुरू झाले. त्यामुळे आता सरकारी वकील कोल्हे यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी बुधवारी होत आहे.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला प्रोसेस इश्यूच्या आदेशाविरुद्ध इंदोरीकर यांच्यावतीने सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने पूर्वीच या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालय ऐकणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजाला बरीच बंधने होती. त्यामुळे शक्यतो लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. मागील तारखेला यासंबंधीची तयारी झालेली नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता सरकारी वकिलांनी माघार घेतल्याने बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपण हा खटला चालवू शकत नसल्याचे कळविले असून, लवकरच त्यांच्या जागी नवीन सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सतीश पाटील
जिल्हा सरकारी वकील