पुणे जिल्हा | सरकारचे धोरण चुकीचे – शरद पवार

जेजुरी, (वार्ताहर) – एखादी योजना घाईने जाहीर करायची अमलात आणायची नंतर खर्च कशासाठी करतो आहोत याची उत्तरे देता येत नाहीत, असे सरकार चुकीचे धोरण राबवत आहे. राज्यातील विविध ठेकेदारांचे सुमारे 48 हजार कोटी रुपये थकविण्यात आले आहेत ते सर्वजण आंदोलनाच्या तयारीत आहेत.
स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी अभ्यासपूर्ण आर्थिक नियोजन करून राज्य प्रगतीपथावर नेण्याचे काम केले मात्र सध्याचे सरकारचे काम पाहता असे राज्यकर्ते कधीही पाहिले नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून व शासन निधीतून जेजुरी पोलीस ठाण्यालगत उभारण्यात आलेल्या मल्हार नाट्यगृहाचे, राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान टप्पा क्र.1, महात्मा फुले भाजी मार्केट,
नवीन शासकीय विश्रामगृह आदीं विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण मंगळवारी (दि. 8) शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अद्ययावत बसस्थानक,
लगतच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ,मुख्य चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णआकृती पुतळा ,मोरगाव -नीरा बायपास रस्ता आदी विकास कामांचे डिजिटल प्रणालीद्वारे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे, स्वागताध्यक्ष आमदार संजय जगताप, प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, संभाजीराव झेंडे, सुदामराव इंगळे, विजय कोलते,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, माणिक झेंडे, माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, दत्ताजी चव्हाण, ज्येष्ठ कलावंत लीला गांधी आदींसह जेजुरी नगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहराच्या जवळ असलेल्या ऐतिहासिक पुरंदरला महापुरुषांचा मोठा वारसा लाभलेला असून आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली असून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी 16 एकर स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली आहे.
पुढील काळात तालुक्यामध्ये प्रलंबित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे. बाधित असलेल्या शेतकर्यांची अशी अपेक्षा प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली.
जेजुरी नगरीचा विस्तार आणि विकासाला चालना द्यायची असेल तर ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या पालिकेमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे असे मत सुदामराव इंगळे यांनी मांडले.
तर पुढील काळात शरद पवार जो निर्णय घेतील त्या विचारांशी बांधील राहून सर्वजण कार्यरत राहतील असे दिलीप बारभाई यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हेमंत सोनवणे यांनी तर अजिंक्य देशमुख यांनी आभार मानले.
पुणे हे सांस्कृतिक वारसा जपणारे शिक्षणाचे माहेरघर असून येथे महिला व मुली सुरक्षित नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमचा निधी अडवून अनेक विकासकामांना अडथळा आणण्याचे काम सध्याच्या सरकारने केले आहे. – सुप्रिया सुळे, खासदार
सध्याचे सरकार हे ठेकेदारांचे असून टक्केवारीशिवाय कामे होत नाहीत. तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम खासदार सुळे आणि मी केले पण,
केवळ नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी इतर प्रश्न निर्माण करीत लक्ष विचलित करायचे विकासकामांच्या निधीला कोलदंडा टाकून कामे अडवून ठेवायचे हे धोरण राबविल्यानेच मागील काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. -संजय जगताप, आमदार, पुरंदर-हवेली
भाजपकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
जेजुरीत मंगळवारी उद्घाटन करण्यात आलेले नाट्यगृह हे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निधीतून बांधण्यात आले आहे.
याच्या उद्घाटनाचाकार्यक्रम नगरपालिकेने आयोजित न करता काँग्रेस व पवार गटाने हा खासगीपक्षीयकार्यक्रम आयोजित केला, असा आरोप करीत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणार्या भाजपच्या 30 ते पस्तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर भाजपाध्यक्ष निलेश जगताप,महिला आघाडीच्याअलका शिंदे,जेजुरी भाजपा अध्यक्ष गणेश भोसले, माजी अध्यक्ष सचिन पेशवे आदींचा समावेश होता.
पवार यांचा कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले नंतर या कार्यकर्त्यांनी उघडा मारुती चौकात येऊन हरियाणात भाजपला विजय मिळाल्याबद्दल फटाक्याचीआतषबाजी केली. एकमेकाला पेढे भरून जल्लोष साजरा केला.





