पुणे – सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, म्हणून महसूल विभागांर्तगत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर सात दक्षता पथके स्थापन करण्यात येत असून, या पथकांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महसूल विभागातील विविध गैरप्रकार उघडकीस येत असल्याने आता महसूल अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची वेळ शासनावर आली असल्याचे बोलले जात आहे. जमीन मोजणी, गौण खनिज, मुद्रांक शुल्क आणि इतर महसूलविषयक कामकाजात होणाऱ्या अनियमितता व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या गंभीर स्वरूपांच्या तक्रारीचे सखोल परीक्षण करणे अत्यावश्यक असून, तक्रारींच्या अनुषंगाने योग्य चौकशी झाल्यास प्रशासनाची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे अशा तक्रारींची तात्काळ निष्पक्ष चौकशी होण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दक्षता पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय समितीचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त असणार आहेत, तर सदस्य सचिव हे याच कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तर सदस्य म्हणून जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सह जिल्हा निबंधक, तहसीलदार दर्जाचे अधिकारी आदींचा यामध्ये समावेश असणार आहे. चौकशीदरम्यान किमान चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गरज पडल्यास हे पथक दुसऱ्या विभागातही जाऊन तपासणी करू शकेल, असेही शासनाने म्हटले आहे. अशी आहे कार्यपद्धती शासन स्तरावरून आलेल्या तक्रारींची चौकशी करून दक्षता पथकाला ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करावा लागेल. जर तक्रार गंभीर स्वरूपाची असेल, तर केवळ १५ दिवसांच्या आत अहवाल देणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही एका अधिकाऱ्याला स्वतंत्रपणे जाऊन तपासणी करता येणार नाही. तपासणीच्या वेळी पथकातील किमान ४ अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यामुळे पारदर्शकता राहील. दक्षता पथकाने मागितलेली कागदपत्रे किंवा अभिलेख वेळेत उपलब्ध करून न दिल्यास, संबंधित कार्यालय प्रमुखावरच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यास दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यावर ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ नुसार कडक कारवाई केली जाईल.