Satara | सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द

सातारा, (प्रतिनिधी) – सैन्यदल, माजी सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे. ज्या हुतात्मा जवानांच्या परिवारांना अद्याप जागा मिळालेली नाही, त्यांच्या जागेचा प्रश्न हुतात्मा गजानन मोरे यांच्या हौतात्मदिनाच्या (दि. 27 ऑगस्ट) पूर्वी मार्गी लावू. मंत्रालय स्तरावर आढावा घेऊन या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
25 वा कारगिल विजय दिवस सैनिक कल्याण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सैनिक कल्याण विभागाचे राज्याचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड, निवृत्त जनरल विजय पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) आर. आर. जाधव, पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सतीश हंगे, सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चवदार,
सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर (सेनापदक), माजी उपनगराध्यक्ष व माजी नौसैनिक शंकर माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारगिल युद्धातील राज्यातील हुतात्म्यांच्या वारसांचा, युद्धात अपगंत्व आलेल्या आणि शौर्यपदकविजेत्या अधिकारी व जवानांचा पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला.
ना. देसाई म्हणाले, सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशसेवा करताना जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म पत्करले. आपले जवान छातीचा कोट करुन परकीय आक्रमणे परतवून लावतात. देशाच्या सीमांचे अहारोत्र रक्षण करतात.
कणखरपणा हीच सैनिकांची ओळख आहे. त्यांच्याबद्दल गौरव आणि सन्मानाची भावना जोपासणे, हे आपले कर्तव्य आहे. येत्या 15 ऑगस्टपासून वॉर मेमोरियलला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरू करण्यात येईल.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते; परंतु दिल्लीत महत्त्वाची बैठक असल्याने आणि खराब हवामानामुळे कराड येथे विमान उतरवण्यात अडथळा येईल, असे यंत्रणेकडून सांगण्यात आल्याने त्यांना येता आले नाही, असे सांगून पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांचे वारस, माजी सैनिक, कार्यरत सैनिक यांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा दिवस अभिमान आणि गौरवाचे प्रतीक आहे. या युद्धात हौतात्म पत्करलेल्या आणि अपंगत्व आलेल्या सैनिकांबद्दल राज्य सरकार सदैव कृतज्ञ आहे.
संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. सातारा हा सैनिकांचा जिल्हा असल्याचा अभिमान आहे. मिलिटरी अपशिंगेच्या विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईत युद्धसंग्रहालय उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
वीरमाता कालिंदी महाडिक, वीरपत्नी उज्ज्वला निकम, वीरपत्नी विद्या सानप यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश गायकवाड यांनी प्रास्ताविकात सैनिकांच्या कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी पालकमंत्र्यांनी हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मृतिउद्यानात पुष्पचक्र अर्पण करून, अभिवादन केले. आर. आर. जाधव यांनी आभार मांडले.





