Satara | अर्थव्यस्थेला चालणा देण्यासाठी शासन उद्योजकांच्या पाठीशी

सातारा, (प्रतिनिधी) – राज्यात उद्योग वाढले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील. उद्योग वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून सोयी-सुविधा देण्याबरोबर शासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
केबीपी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे इग्नाईट महाराष्ट्र अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उद्योग विभागाचे सह संचालक एस.जी. राजपुत, सहसंचालक उमेश पाटील, मासचे अध्यक्ष संजोग मोहिते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ.सु. दंडगव्हाळ, उमेश पाटील आदी उपस्थित होते
शासनाच्या उद्योग विभागाकडून राज्यात मोठे उद्योग यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे झालेल्या आर्थिक परिषदेतून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणत उद्योग येणार आहेत.
पालकमंत्री या नात्याने आपण सदैव उद्योजकांच्या विशेषतः तरुण उद्योजकांच्या पाठीशी राहिलो आहे. एमआयडीसीमधील पायाभूत सुविधा देण्यावर शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्याचबरोबर उद्योगांना सवलती देण्यासाठी शासनाने तसेच प्रशासनाने विविध निर्णय घेतले आहेत.
याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन उद्योजकांचे काही प्रश्न असल्यास उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी बैठक लावून प्रश्न सोडविले जातील, असेही आश्वासन पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा उद्योग पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक परफेक्ट मेटल, सातारा, द्वितीय क्रमांक विभागून गिरी उद्योग व शाही नमकीण या उद्योगांचा समावेश आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचेही वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचा ही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.





