Mouth Ulcers: तोंड आलंय? हे सोपे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Mouth Ulcers बहुतेक वेळा तोंड येण्याचा त्रास काही दिवसांत आपोआप कमी होतो. मात्र, तोपर्यंत होणारा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायांमुळे सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते.

Mouth Ulcers: तोंड येणे ही अनेकांना भेडसावणारी सामान्य समस्या आहे. गालाच्या आतील भागात, जिभेवर, हिरड्यांवर किंवा ओठांच्या आतील बाजूला लहान जखमा किंवा फोड तयार होतात. आकाराने लहान असले तरी त्यांच्यामुळे खाणे, पाणी पिणे, बोलणे आणि दात घासणेही त्रासदायक होते. त्यामुळे वेदना, जळजळ आणि अस्वस्थता जाणवते.
बहुतेक वेळा तोंड येण्याचा त्रास काही दिवसांत आपोआप कमी होतो. मात्र, तोपर्यंत होणारा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायांमुळे सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते. मात्र, तोंड वारंवार येत असेल किंवा दोन आठवड्यांहून अधिक काळ त्रास कायम राहत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तोंड का येते?
तज्ज्ञांच्या मते, तोंड येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीरात व्हिटॅमिन बी-12, लोह किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता, जास्त ताण-तणाव, हार्मोन्समधील बदल, तोंडाला झालेली दुखापत किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. काही वेळा तिखट, मसालेदार किंवा अतिगरम पदार्थ खाल्ल्यानेही हा त्रास वाढू शकतो.
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
तोंड आल्यावर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे. मिठामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे तोंडातील जंतू कमी होण्यास मदत होते. तसेच सूज आणि जळजळ कमी होऊन जखमा लवकर भरून येण्यास मदत मिळू शकते.
मधाचा वापर ठरू शकतो फायदेशीर
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. तोंड आलेल्या जागी हलक्या हाताने मध लावल्यास वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच मधामुळे त्या भागावर एक संरक्षणात्मक थर तयार होतो, ज्यामुळे बाहेरील त्रास कमी जाणवतो.

Mouth Ulcers
खोबरेल तेलही देऊ शकते आराम
खोबरेल तेलात असलेले लॉरिक अॅसिड जंतूंशी लढण्यास मदत करते. तसेच ते सूज कमी करण्यासही उपयुक्त मानले जाते. तोंड आलेल्या जागी थोडेसे खोबरेल तेल लावल्यास वेदना आणि जळजळ कमी होऊ शकते. मात्र, तेल लावल्यानंतर त्रास वाढल्यास त्याचा वापर थांबवावा.
बेकिंग सोड्याचाही होऊ शकतो उपयोग
पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळून गुळण्या केल्यास तोंडातील आम्लता (pH) संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे जळजळ कमी होऊ शकते. मात्र, हा उपाय मर्यादित प्रमाणातच करावा.
थंड पाण्यामुळे मिळू शकतो दिलासा
तोंड आल्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी थंड पाणी पिणे किंवा बर्फाचा छोटा तुकडा काही क्षणांसाठी त्या भागाजवळ धरल्यास आराम मिळू शकतो. थंडपणामुळे त्या भागातील संवेदनशीलता कमी होते आणि काही काळ वेदना कमी जाणवतात. मात्र, बर्फ थेट आणि जास्त वेळ त्या जागेवर ठेवू नये.
भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास किंवा शरीरातील उष्णता वाढल्यास तोंड येण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि पोषक घटकांचा समावेश केल्यासही हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
घरगुती उपायांमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र, तोंड वारंवार येत असेल, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास टिकत असेल, खूप वेदना होत असतील किंवा ताप, अशक्तपणा यांसारखी इतर लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण काही वेळा तोंड येणे हे शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे किंवा इतर आजारांचे संकेत असू शकतात.





