कमालच झाली! अवघ्या 8 महिन्यांच्या नोकरीत तब्बल 30% पगारवाढ आणि प्रमोशन, ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

Google Employee Post : खासगी कंपनीत काम करताना पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना वर्षभर थांबावे लागते. वर्षभरानंतरही पगार वाढ होईल की नाही, याची कोणतीच खात्री नसते. त्यामुळे पगारवाढीसाठी अनेक कर्मचारी इतर कंपन्यांमध्ये शिफ्ट होतात. मात्र, एका कंपनीतील कर्मचाऱ्याला अवघ्या 8 महिन्यांच्या नोकरीत तब्बल 30 टक्के पगारवाढ मिळाली, असे कोणी तुम्हाला सांगितले तर? यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, असे खरचं घडले आहे. तेही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलच्या कर्मचाऱ्यासोबत.
गुगलच्या कर्मचाऱ्याने शेअर केला अनुभव
गुगलचा माजी कर्मचारी जॅरी ली यांनी स्वतःचा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला आहे. जॅरी वर्ष 2018 मध्ये स्ट्रॅटजिस्ट म्हणून गुगलमध्ये जॉइन झाले होते. मात्र, 2021 मध्ये नोकरी सोडली तेव्हा ते सीनिर स्ट्रॅटजिस्ट आणि ऑपरेशन मॅनेजर पदावर पोहोचले होते. म्हणजेच अवघ्या 3 वर्षात त्यांना प्रमोशन देखील मिळाले.
जॅरी यांनी थ्रेडवर लिहिले की, ‘गुगलमधील पहिले दोन महिने माझ्यासाठी विचित्र होते. मला लक्षात आले होते की, ते मला लहान मुलगा समजत आहेत. कदाचित ते मला ‘नकारात्मक’ समजत होते.‘
ली यांनी पुढे लिहिले की, दोन महिन्यानंतर मी प्रोजेक्ट्स मागायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी मला मार्केटचे विश्लेषण करण्यास सांगितले. त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी कामाला सुरूवात केली. काम करताना मला एका उत्पादनात त्रुटी असल्याचे लक्षात आले.
या प्रोजेक्टचे काम ली यांच्याकडेच देण्यात आले. सोबतच दोन प्रोजेक्ट मॅनेजर, 6 इंजिनिअर्स आणि अन्य 5 विश्लेषकांच्या टीमचे नेतृत्व देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आले. हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर ली यांना 8 महिन्यांमध्येच तब्बल 30 टक्के पगारवाढ मिळाली.
ली यांनी पुढे सांगितले की, प्रमोशनबाबत समजताच मला रडू आले. शैक्षणिक कर्जाची परतफेड करणे व आई-वडिलांना फिरायला घेऊन जाणे, हीच गोष्ट पहिल्यांदा मनात आली. ‘संधी शोधत बसू नका, संधी निर्माण करा’, असा सल्लाही ली यांनी इतरांना दिला आहे. ली यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अवघ्या 8 महिन्यांमध्ये मिळालेल्या प्रमोशन आणि पगारवाढीमुळे अनेक यूजर्स त्यांनी ‘नशीबवान’ म्हणत आहेत.





