पुणेः राज्याच्या ग्रामीण भागातील गावे, खेडी वाड्या वस्त्यापर्यंत लाल परी म्हणजेच एसटी जाते. ग्रामीण भागातील बहुतांशी लोकं एसटीने प्रवास करतात. आजही एसटी ही सर्वसान्यांचे प्रवासाचे साधन आहे, सुरक्षित प्रवास हे एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, आजही एसटी बसेची अवस्था फार वाईट असल्याचे दिसते. यावरच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाची कामकाज आढावा बैठक घेतली. या बैठकीत दरवर्षी एसटी महामंडळ ५ हजार स्वमालकीच्या एसटी बसेस खरेदी करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात आणि महामंडळातील विविध समस्यांबद्दल परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळाची कामकाज आढावा बैठक पार पडली. या बैठकीला एसटी महामंडाळातील अधिकारीवर्ग उपस्थित होते. एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या बसेस खरेदी करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात, अशा सूचना परिवहन मंत्र्यांनी अधिकारी वर्गाला दिल्या. यासाठी जाहिरात धोरण, डिझेल पंप या महत्वाच्या बाबींबर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या सह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन
एसटीच्या ताफ्यात ई-शिवाई बसेस दाखल झाल्या आहेत. राज्याच्या विविध मार्गांवर या ई-शिवाई बसेस धावत आहेत. आगामी काळात आणखी इलेक्ट्रीक बसेस महामंडळात दाखल होणार आहेत. यामुळे प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.