गुड न्यूज : पिंपरीत करोनामुक्तीचा “टक्का’ वाढला

  • शहरवासीयांना दिलासा; रुग्णांचे प्रमाण घटतेयं
  • करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्‍क्‍यांवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी वेग मात्र काही प्रमाणात कमी झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही आकडेवारी आता 81 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. ही बाब शहरासाठी दिलासादायक ठरू लागली आहे.

शहरात 12 मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्याच आठवड्यात बाधितांची संख्या 15 पर्यंत पोहोचल्यानंतर 28 मार्चपर्यंत नवीन रुग्ण आढळला नव्हता. शहर करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच 29 मार्चपासून शहरात पुन्हा रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. मे महिन्यापर्यंत करोनाबाधितांचा आकडा अटोक्‍यात ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील करोनाबाधितांचा आकडा अचानकपणे वाढला होता.

करोनाबाधितांची संख्या खऱ्या अर्थाने जुलैच्या 20 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा ओलांडाला होता. मात्र 18 सप्टेंबरपासून या आकडेवारीमध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 8 दिवसांपासून शहरातील बाधितांचा आकडा 800 ते 900 च्या मध्ये रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एका बाजूला रुग्ण कमी होत असतानाच बरे होण्याचे प्रमाण मात्र एक हजाराच्या पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्ण कमी आणि बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असे चित्र गत आठवड्यात शहरामध्ये पहावयास मिळाल्यामुळे किंचित का होईना शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत 73 हजार 260 जणांना करोनाची बाधा झाली असली तरी त्यापैकी 59 हजार 544 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्यांचे हे प्रमाण 81 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. आतापर्यंत शहरातील 1203 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. बाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण हे पावणेदोन टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. मृतांची टक्केवारी ही सर्वांत कमी रोखण्यातही प्रशासन काही प्रमाणात यशस्वी ठरले आहे.

चाचण्या घटल्याचाही परिणाम
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांतील अँटीजेन व स्वॅबद्वारे (आर्टिफिशरी) चाचणी करण्यात येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले होते. मात्र 15 सप्टेंबरनंतर या चाचण्यांचा वेग काही प्रमाणात कमी झाल्यामुळेही बाधितांची आकडेवारी घटल्याचे बोलले जात आहे. तर सुरुवातील स्वत:हून चाचणीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा चाचणी करून घेण्याचा कलही घटल्याचा परिणामही बाधितांची संख्या कमी होण्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आतापर्यंत शहराबाहेरील 412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहराबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असतानाही मृत्यूचा आकडा मात्र मोठा आहे. अत्यंत उशिरा अथवा इतर ठिकाणी उपचारास नकार दिल्यानंतर शहराबाहेरील रुग्ण शहरात उपचारासाठी येत असल्याचा परिणाम मृत्यूदर वाढीमध्ये होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.