- अन्य साहित्याच्या होलसेल विक्रेत्यांना दिली जाणार परवानगी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांना साहित्य पुरवठा करणारी स्टील, सिमेंट,पत्रे, टाईल्स व दार, खिडक्या विक्रीच्या दुकानांना व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त साहित्याची होलसेल (ठोक) विक्रेत्यांच्या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवारपासून (दि. 11) याबाबतचे अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “करोना कोविड 19′ या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणारी दुकाने व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त विविध साहित्याच्या ठोक विक्रेत्यांच्या दुकानांनाही परवानगी देण्यात येणार आहे. बिल्डिंग साहित्य पुरवठा करणारी दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या ठोक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्त अन्य दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या शहरातील 32 प्रभागानुसार एका प्रभागात 500 मीटरच्या अंतरावर एक ठोक विक्रेत्याचे तसेच बांधकाम साहित्याचे एक दुकान चालू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार संबंधितांनी परवानगीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयानुसार अर्ज करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुकानांच्या परवानगीबाबत निर्णय घ्यावेत, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि. 10) दिले आहेत.
निवडणुकीच्या प्रत्येक प्रभागाची रचना विचारात घेवून प्रत्येक मुख्य रस्ता, चौक या ठिकाणी वरील दुकानांना रोटेशनप्रमाणे आलेल्या अर्जांची छाननी करून परवानगी दिली जाईल. एकाच भागांत अनेक अर्ज आल्यास दुकान चालू करण्याबाबत दिवस नेमून देण्यात येईल. अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात येणार आहे. ग्राहकांना माल खरेदीला येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकास दुकानातील वस्तूंना हात लावू न देणे ही विक्रेत्याची जबाबदारी राहणार आहे.
विक्रेत्याने ग्राहकांना प्रवेश देताना सॅनिटायझर, मास्कचा वापर तसेच दोन ग्राहकांमधील अंतर एक मीटरपेक्षा जास्त राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना व पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात प्रवेश बंदी असणार आहे. माल खरेदीला आल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय गुन्हा मानला जाणार आहे.
माल खरेदीला आल्यानंतर या परिसरात गुटखा खाण्यास अथवा गुटखा खावून थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या अटींचा भंग झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करून परवानगी रद्द करण्यात येणार असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.