मुंबईः आज १ मार्च हा दिवस परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील एका शहराला नवा आरटीओ नंबर देण्यात आला आहे. त्या शहराचे नाव मीरा भाईंदर असून या विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहराला आता MH 58 हा नवा आरटीओ नंबर देण्यात आला आहे. मूळात मीरा भाईंदर या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. परिणामी येथील वाहनांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. यामुळे नव्या RTO नंबरमुळे येथील वाहनाधारकांना याचा फायदा होणार आहे. 2009 पासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मीरा भाईंदर या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या शहरातील वाढणारी वाहनांची संख्या पाहता येथे नवे आरटीओ कार्यालय देखील उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 58 वे मीरा भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उभे राहणार आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी शासनाने जाहीर केला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता शहराला एक वेगळी ओळख मिळणारी आहे. तसेच मीरा भाईंदर येथे दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्धाटन देखील होणार आहे. भविष्यात पोलीस आयुक्तालय देखील मीरा भाईंदर येथे निर्माण करण्याचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.