नवी दिल्ली: महागाई आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, खाजगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी २०२६ हे वर्ष सुखावह ठरण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात, असा अंदाज एका ताज्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंपन्या आता केवळ ठराविक पगारवाढीवर लक्ष न देता, कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कामगिरीवर आधारित बोनस (Short-term Incentives) देण्यावर जास्त भर देत आहेत. ऑटो आणि हाय-टेक सेक्टरमध्ये सर्वाधिक – मर्सरच्या अहवालानुसार, सर्वच क्षेत्रांत पगारवाढ होणार असली तरी ऑटोमोबाईल आणि हाय-टेक क्षेत्रातील कर्मचारी आघाडीवर राहतील. ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक ९.५% पगारवाढीची शक्यता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणाऱ्या बदलांमुळे येथे ९.३% वाढ अपेक्षित आहे. आयटी (IT) आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये (GCC) पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी (Well-being) विशेष सुविधांवर भर दिला जाणार आहे. आता ‘डिग्री’पेक्षा ‘स्किल्स’ला जास्त महत्त्व – अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कंपन्या आता जुन्या पगार पद्धतीत बदल करत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे दुर्मिळ किंवा आधुनिक कौशल्ये (उदा. AI, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन) आहेत, त्यांना इतरांपेक्षा जास्त पॅकेज आणि इंसेंटिव्ह दिले जात आहेत. ‘स्किल्स बेस्ड पे’ हा नवा ट्रेंड २०२६ मध्ये अधिक प्रबळ होणार आहे. शॉर्ट-टर्म इंसेंटिव्ह आणि बोनसवर जोर – मर्सर इंडियाच्या सल्लागार प्रमुख मालती के.एस. यांनी सांगितले की, “कंपन्या सध्या खर्चाचे नियोजन आणि चांगल्या टॅलेंटला टिकवून ठेवणे या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत.” यामुळेच आता फिक्स्ड सॅलरीपेक्षा परफॉर्मन्स लिंक्ड बोनस आणि शॉर्ट-टर्म इन्सेंटिव्हजवर कंपन्यांचा अधिक कल दिसून येत आहे. नवीन कामगार कायद्यांचा होणार फायदा – येणाऱ्या काळात देशात नवीन श्रम कायदे लागू होण्याची शक्यता आहे. या कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा (Social Security) आणि आरोग्य सुविधा अधिक मजबूत होतील, असेही या अहवालात म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ आर्थिक लाभच नाही, तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि चांगला अनुभवही मिळेल. दरम्यान, १५०० हून अधिक कंपन्या आणि ८००० हून अधिक पदांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वैयक्तिक कामगिरी आणि महागाईचा दर हे पगारवाढीचे मुख्य आधार असतील. करिअर प्रगती आणि ‘वर्क एक्सपिरियन्स’ला पॅकेजमध्ये विशेष स्थान मिळणार.