मुंबईकरांसाठी गुड न्यूज; रेड्डीज लॅबोरेटरीज पुरविणार स्पुटनिक लस

मुंबई – मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. आता मुंबईकरांना स्पुटनीक लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. लसींच्या तुटवड्याअभावी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढत लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान आता डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत बोलणी यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड – 19 प्रतिबंधक लस देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर प्रसिद्धीस दिलेल्या लस पुरवठा स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये प्रतिसाद दिलेले सर्व 9 संभाव्य पुरवठादार कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरले आहेत.
असे असले तरी, महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज संपर्क साधला असता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा देण्याची तयारी दर्शविली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. त्यास प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रं पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली होती.



