शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा १०५% पाऊस, मान्सूनचा जोर वाढणार – IMDचा अंदाज

मुंबई: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) २०२५ च्या मान्सूनसाठी पहिला अंदाज जाहीर केला असून, यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा अल निनोचा धोका नसल्याने पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. हा प्राथमिक अंदाज असून, पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज जाहीर केला जाईल.
पावसाची टक्केवारी कशी ठरते?
हवामान खात्याने पावसाच्या प्रमाणानुसार पाच श्रेणी निश्चित केल्या आहेत:
९०% पेक्षा कमी: अपुरा पाऊस
९०-९५%: सरासरीपेक्षा कमी
९६-१०४%: सरासरी इतका
१०५-११०%: सरासरीपेक्षा जास्त
११०% पेक्षा जास्त: सर्वाधिक पाऊस
मान्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे
नेहमीप्रमाणे १ जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर दाखल होईल. त्यानंतर ७-८ दिवसांत तो मुंबईपर्यंत पोहोचेल. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असल्याने मान्सून आपल्या नियोजित वेळेत भारतात येण्याची शक्यता आहे.
स्कायमेटचा अंदाज: अल निनोचा प्रभाव नाही –
खासगी हवामान संस्था स्कायमेटनेही मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. यंदा ला निना कमकुवत आणि अल्पकालीन असेल, तर अल निनोचा प्रभाव जवळपास नगण्य राहील. यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण मिळेल. हिंदी महासागरातील परिस्थिती (इंडियन ओशन डायपोल – IOD) सकारात्मक असल्याने पावसाला पोषक वातावरण आहे. विशेषतः मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (जुलै-ऑगस्ट) पाऊस अधिक जोरदार असेल, असे स्कायमेटने नमूद केले.
इतर घटकांचाही प्रभाव
अल निनोशिवाय इंडियन ओशन डायपोल (IOD) आणि दक्षिणी दोलन (Southern Oscillation) यांचाही मान्सूनवर परिणाम होतो. सध्या IOD प्रभावहीन आहे, पण यामुळे मान्सूनच्या सुरुवातीला सकारात्मक चित्र आहे. मान्सूनच्या मध्यापासून (जुलै) पावसाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी समृद्धी घेऊन येणार असल्याने शेतीसह अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची आशा आहे.





