Prajakta Mali : चाहत्यांसाठी गुडन्यूज! प्राजक्ता माळीची साऊथमध्ये एन्ट्री, नव्या प्रोजेक्टची अपडेट समोर
Prajakta Mali : मात्र चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Prajakta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, चित्रपट निर्मिती आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मराठी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत विविध भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे ती महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. आता ती तेलुगू चित्रपटसृष्टीत झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भातील तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्राजक्ता या चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार, याबाबत चाहत्यांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर आता तिच्या साऊथ इंडस्ट्रीतील नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्राजक्ताच्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमधून झाली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे. २०११ मध्ये ‘सुवासिनी’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर २०१३ मध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील ‘मेघना देसाई’ या भूमिकेने तिला घराघरांत पोहोचवले.
अभिनेत्री म्हणून यश मिळवल्यानंतर प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले. तिची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असलेला ‘फुलवंती’ हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला. या चित्रपटातील नर्तकीची भूमिका साकारताना तिने आपल्या भरतनाट्यम कौशल्याचाही प्रभावीपणे वापर केला. आता मराठीनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीतही ती आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे.






