नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधी (EPF) काढण्यासाठी आता लांबलचक प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या कटकटीतून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. केंद्र सरकार पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया थेट ATM आणि UPI शी जोडण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली असून, मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा प्रत्यक्ष अमलात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दैनंदिन बँकिंगप्रमाणेच होणार व्यवहार – एका मुलाखतीदरम्यान माहिती देताना श्रम मंत्र्यांनी सांगितले की, “ज्याप्रमाणे लोक रोजच्या व्यवहारांसाठी ATM आणि UPI चा वापर करतात, त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या हक्काचा पीएफचा पैसाही सहज मिळायला हवा. सध्या पीएफ काढण्यासाठी अनेक फॉर्म भरावे लागतात, ज्यामुळे क्लेम सेटलमेंटला उशीर होतो. ही प्रक्रिया डिजिटल करून अधिक पारदर्शक आणि वेगवान बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.” प्रक्रियेत होणार मोठे बदल: सदस्यांना ऑनलाइन पोर्टल किंवा एम्प्लॉयरवर (मालक) अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पीएफ खात्यातून पैसे थेट नोंदणीकृत बँक खात्यात येतील, जे ATM कार्ड किंवा UPI द्वारे वापरता येतील. सध्या सदस्य त्यांच्या जमा रकमेतील ७५% रक्कम काढू शकतात, ही सुविधा भविष्यात अधिक सुलभ केली जाईल. १३ वेगवेगळ्या श्रेणींच्या अर्जांचे एकत्रिकरण करून एकच सोपा ‘सिंगल विंडो’ ढांचा तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होईल. ईपीएफओने (EPFO) ऑक्टोबर २०२५ मध्ये कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक सुधारणा मंजूर केल्या होत्या. त्याचाच पुढचा भाग म्हणून मार्च २०२६ पर्यंत ही ATM सुविधा सुरू केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा पैसा आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीने उपलब्ध होऊ शकेल. सरकारच्या या निर्णयामुळे करोडो पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.