Maharashtra -Gujarat – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याने आता यामुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान नेटवर्क २२४ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २,७८१ कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमध्ये गुजरातमधील द्वारका-कनालस रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे. माहिती-प्रसारण तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने एकूण २,७८१ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. देवभूमी द्वारका (ओखा)-कनालस रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्याने द्वारकाधीश मंदिराशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच कोळसा, मीठ, सिमेंट आणि इतर वस्तूंची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे १८ एमटीपीए (दरवर्षी दशलक्ष टन) अतिरिक्त मालवाहतूक करता येवू शकेल. बदलापूर-कर्जत विभाग हा मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा अविभाज्य भाग आहे. येथील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांमुळे मुंबई उपनगरीय क्षेत्रातील संपर्क व्यवस्था आणखी सुधारेल. या मार्गामुळे दक्षिण भारताशी संपर्क व्यवस्था देखील वाढेल. यामुळे भविष्यातील प्रवाशांच्या मागण्या पूर्ण होण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागेल. गुजरात आणि महाराष्ट्रात देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पूर्ण वेगाने सुरू असताना केंद्र सरकारने या दोन बहु-ट्रॅक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गुजरात विभागात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणी रन २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः दिले आहेत.