पिंपरी | ‘बीएसएनएल’ला आले अच्छे दिन

पिंपरी, (प्रतिनिधी) – खासगी मोबाइल कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहक पुन्हा बीएसएनएलच्या सेवेकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. चिंचवड येथील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाकडे दररोज नवीन आणि सेवा पोर्ट करण्यासाठी सुमारे ४० अर्ज येत आहेत.
खासगी मोबाइल सेवा देणार्या कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरामध्ये साधारणतः २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे अनेकजण पुन्हा बीएसएनएलकडे वळल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी टेलिफोन सेवा पुरविणारी बीएसएनएल ही एकमेव कंपनी होती. त्यानंतर अनेक खासगी कंपन्यांनी यामध्ये शिरकाव केला. पूर्वी शहरात, चिंचवड स्टेशन, खराळवाडी, आकुर्डी, सांगवी, वाकड, भोसरी या ठिकाणी कार्यालये होती. मात्र ग्राहकांचा ओढा खासगी कंपन्यांकडे वाढल्याने कालांतराने ही कार्यालये बंद करण्यात आली. सध्या चिंचवड स्टेशन येथील एकमेव कार्यालय सुरू आहे.
खासगी कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविल्याने ग्राहक पुन्हा सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलकडे वळले आहेत. सोशल मीडियावर खासगी कंपन्यांच्या विरोधात राळ उठत असून बीएसएनएलसोबत खासगी कंपन्यांच्या दरांची तुलना केली जात आहे.
बीएसएनएलच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयात नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तसेच सेवा पोर्ट करण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. यामुळे आता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारीही कार्यालय सुरू ठेवावे लागत आहे.
बीएसएनएलकडून ५जी साठी प्रयत्न सुरू
सध्या बीएसएनएलकडून ४जी सेवा पुरविण्यात येत आहे. लवकरच ५जी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. असे झाल्यास बीएसएनएलकडे ग्राहकांचा कल आणखी वाढण्याची शक्यता आहे.
असे करावे लागते पोर्ट
सध्या सुरू असलेल्या मोबाइलवरून PORTSEND TO 1900 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. UPC कोड आल्यानंतर बीएसएनएलच्या कार्यालयात जाऊन २० रुपयांचे नवीन सिम कार्ड घ्यायचे आहे.
तसेच २४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अगदी १८ रुपयांपासून रिचार्च उपलब्ध आहेत. ५२ रुपयांचा दररोज एक जीबीचा रिचार्ज २९८ रुपये, ७० दिवसांचा एक जीबीचा रिचार्ज ३९९ रुपये, तर वर्षाचा ६०० जीबीचा प्लॅन एक हजार ९९९ रुपयांचा उपलब्ध आहे.

