राज्यातील दूध उत्पादकांना “अच्छे दिन’
परराज्यांतून दुधाची मागणी वाढली
गाईच्या दुधाचा खरेदी दर 1 रुपयाने वाढला
दूध पावडरच्या दरात किलोमागे 20 रुपयांनी वाढ
पुणे – महाराष्ट्रातील दुधाला दिल्ली येथील खासगी डेअरींकडून मागणी वाढली आहे. त्यातच आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील दूध खरेदीची त्यात भर पडली आहे. दररोज महाराष्ट्रातून सुमारे 20 लाख लिटरहून अधिक दूध खरेदी सुरू असल्यामुळे बहुतांशी दूध संस्थांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर सरसकट एक रुपयाने वाढविला आहे. याशिवाय दूध पावडरचे दर वाढल्यामुळेही खरेदीसाठी स्पर्धा वाढल्याचे चित्र आहे.
दूध पावडरच्या दरात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या दूध पावडरचा भाव किलोस 270 ते 275 रुपये, तर गाईच्या दुधापासूनच्या पावडरचा दर 240 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाची खरेदी 28 रुपये 25 पैसे लिटर या भावाने सुरू आहे. गतवर्षी याच काळात दूध पावडरचा मोठा साठा राज्यात शिल्लक होता, त्यामुळे अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान, पावडर निर्यातीसाठी राज्य सरकारने प्रतिकिलोस 50 रुपये अनुदान दिल्याने दूध पावडर निर्यात वाढली. चालू वर्षी दूध पावडरचे साठे तुलनेने कमी असल्याने पावडर तयार करण्यासाठीही दुधाला मागणी वाढली आहे.





