दावडी, – काही पालक विद्यार्थ्यांना मुलांना महागडी, घड्याळे, स्मार्ट फोन दुचाकी, फोर व्हीलर गिफ्ट करतात, हे कालबाह्य होते, यापेक्षा चांगले शिक्षण व चांगले संस्कार विद्यार्थ्यांना दिले तर ते चिरंतन टिकतात. पालकांनी मुलांच्या नावे पैशांच्या ठेवी ठेवण्यापेक्षा संस्काराच्या व ज्ञानाच्या ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन के. डी. चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. के. डी. चौधरी पाटील यांनी केले. खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथील के. डी. चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालचमुंचा स्नेहमेळा व पारितोषिक वितरण समारंभ अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे नुकताच संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या स्नेहमेळ्यामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती विविध नृत्यातून सादर केली. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. के .डी .चौधरी पाटील यांच्या फिनिक्स-संघर्ष एका प्रवासाचा या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, विद्यानिकेतन स्कूल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष शामराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली, सांस्कृतिक कार्यक्रमात नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, केसाचा अंबाडा, पायात घुंगरचाळ असा अव्वल महाराष्ट्रीयन पेहराव करून नटलेल्या मुलींनी महाराष्ट्राची लावणी सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.शेतकर्यांच्या व्यथा मांडणारे मुलांच्या नृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा बनवल्या. शिवमल्हार या विद्यार्थ्यांच्या नृत्याने उपस्थितानच्या तनामनात शिवरायांचा इतिहास जागा केला. महाराष्ट्रीयन साज शृंगार केलेल्या मुलींनी मंगळागौरचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थिनींनी शिवकन्या बनवून मंचावर लाठी, काठी, दांडपट्टा आणि तलवार चालवण्याचे सादरीकरण करून नारीशक्तीची जाणीव करून दिली. स्कूल रिपोर्टचे वाचन व्हा. प्रिन्सिपल रोहिणी गव्हाणे यांनी तर शीतल राक्षे यांनी आभार मानले.