उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेश : मागच्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या अपघातात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील गोंडा या ठिकाणी रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रेन चंदीगडहून दिब्रुगडला जात होती. चंदीगड-दिब्रुगड डाउन एक्सप्रेसच्या एसी कोचचे 4 डबे रूळावरुन घसरले. पिकौरा गावाजवळ हा अपघात घडला.
ही घटना जिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या रेल्वे अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.मात्र, या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याबाबत रेल्वे आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रेल्वे अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना मदत सामग्रीसह घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जवळपासच्या जिल्ह्यांतील मदत पथकेही घटनास्थळी झाली आहेत.





