Gond Laddu : हिवाळा सुरु होताच आपल्या आहारात अशा काही पदार्थांची गरज भासते, जे शरीराला उष्णता, ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती देतात. आपल्या आजी-नानी थंडीच्या दिवसांत बनवणाऱ्या पारंपरिक पदार्थांमध्ये डिंकाचे लाडू हा सर्वात पौष्टिक आणि ऊर्जा देणारा पदार्थ आहे. डिंकाचे लाडू फक्त चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जातात. चला तर पाहूया डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे आणि त्यांची सोपी रेसिपी. डिंकाचे लाडू खाण्याचे जबरदस्त फायदे १) हाडे आणि सांधे मजबूत करतात आयुर्वेदानुसार डिंक हा कॅल्शियमने समृद्ध असतो. त्यामुळे डिंकाचे लाडू हाडांची घनता वाढवतात आणि त्यांना अधिक मजबूत बनवतात. सांध्यांमध्ये होणारी वेदना, कडकपणा आणि हिवाळ्यात वाढणारा त्रास कमी करण्यासही यांचा मोठा फायदा होतो. २) शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते थंडीमध्ये डिंकाचे लाडू हा पारंपरिक उष्ण असलेला पदार्थ आहे. डिंक शरीराचे तापमान संतुलित ठेवतो, थंडी लागणे, अंग गोठणे यांसारख्या त्रासांपासून बचाव करतो. तसंच या लाडूंमध्ये लागणारे शुद्ध तूप देखील उष्ण असल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते. ३) रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. डिंकात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हंगामी आजारांपासून बचाव करतात. ४) त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर डिंकाचे लाडू त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. यातील तूप व सुकेमेवे त्वचेला ओलावा देतात, कोरडेपणा कमी करतात, आणि केसांची मुळे मजबूत ठेवतात. विटामिन–E मुळे केस आणि त्वचा दोन्हीही निरोगी राहतात. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारी सामग्री डिंक — 100 ग्रॅम गहू पीठ — 250 ग्रॅम देशी तूप — 300 ग्रॅम (अंदाजे) पिठीसाखर — 250 ग्रॅम मेवे (बादाम, काजू) — 100 ग्रॅम खोवलेला नारळ — 50 ग्रॅम वेलदोडा पूड — 1 छोटा चमचा डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत 1. कढईत सुमारे 200 ग्रॅम तूप गरम करा. 2. आता डिंक थोडा-थोडा घालून फ्राय करा. डिंक फुलून हलका सोनेरी झाला की बाहेर काढा. 3. थंड झाल्यावर डिंक थोडा जाडसर कुटून घ्या. 4. त्याच कढईत उरलेले तूप घाला आणि त्यात गहू पीठ मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत भाजा. 5. भाजलेले पीठ मोठ्या भांड्यात काढा. 6. आता बदाम-काजू हलके भाजून घ्या आणि नारळ थोडा भाजून घ्या. 7. सर्व भाजलेलं पीठ, कुटलेला डिंक, भाजलेले मेवे, नारळ आणि वेलदोडा एकत्र मिसळा. 8. मिश्रण थोडंसं गार झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळा. (मिश्रण फार गरम असेल तर साखर वितळते, त्यामुळे जरा थंड होऊ द्या.) 9. हाताने गोल लाडू वळा. 10. पूर्णपणे थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात साठवा. अश्या प्रकारे स्वादिष्ट, पौष्टिक आणि उष्णता देणारे डिंकाचे लाडू टायर होतील. हिवाळ्यात दररोज एक लाडू खाल्ल्यास ऊर्जा, उष्णता, हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती चारही गोष्टी उत्तम राहतात.