मथुरा : येथील मिनी कुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदिया पोनो यात्रेच्या पहिल्या दिवशी पाच लाख भाविकांनी गोवर्धन पर्वताची परिक्रमा पूर्ण केली. दरवर्षीप्रमाणे एकूण पाच दिवस ही यात्रा चालणार आहे. सनातन गोस्वामींच्या कृष्णाप्रतिच्या भक्तीचे प्रतीक म्हणून ही परिक्रमा केली जाते.
12 जुलै रोजी ही यात्रा सुरू झाली असून ती 16 जुलैपर्यंत चालणार आहे. शनिवापर्यंत भाविकांची संख्या 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता माहिती सहायक जिल्हा दंडाधिकारी सतीश कुमार त्रिपाठी यांनी वर्तवली आहे. यात्रा बारा जुलैला सुरू झाली असली तरी काही भाविकांनी गोवर्धन परिक्रमा पूर्ण केली आहे. यात्रेचा परिसर फुलून गेला असून वृद्धांसाठी हेलिकॉप्टरमधून परिक्रमेची सोय करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकावेळी सात लोक बसू शकतात. त्यात परिक्रमेला केवळ नऊ मिनिटे लागतात. यासाठी प्रती व्यक्ती तीन हजार रुपये आकारण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. यंदा या यात्रेत लोकसुविधांना प्राधान्य देण्यात आले असून विविध मार्गावर दीड हजार बस सोडण्यात आल्या आहेत.