Goldy Brar : गुरुग्राम बॉम्ब हल्ला प्रकरणी गोल्डी ब्रारसह 5 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममधील दोन क्लबवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. २०२४ मध्ये गुरुग्राममधील दोन क्लबवर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता.
एनआयएच्या तपासात असे उघड झाले आहे की, हा कट दहशतवादी गोल्डी ब्रार आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता. एनआयएने सांगितले की, या प्रकरणात ब्रार आणि मलिक वगळता सर्वांना अटक करण्यात आली आहे. ब्रार हा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येसह भारतात तीन डझनहून अधिक प्रकरणांमध्ये हवा आहे.
एनआयएने सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार, सचिन तालियन, अंकित, भाविश आणि अमेरिकेत राहणारे रणदीप सिंग उर्फ रणदीप मलिक यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्रास्त्र कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएला बॉम्ब हल्ल्यांच्या तपासात असे आढळून आले आहे की आरोपी गुरुग्राममधील सेक्टर-२९ मधील वेअरहाऊस क्लब आणि ह्यूमन क्लबला बॉम्बने लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी होते. या क्लबवर झालेले बॉम्ब हल्ले बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या मोठ्या कटाचा भाग होते.





