प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे पुस्तक महोत्सवअंतर्गत मंगळवारी ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या वेळेत शांतता..पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम संपूर्ण पुण्यात होत आहे.गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय, रिक्षा थांबे, महापालिकेची कार्यालये, सामाजिक संस्थेची कार्यालये, खासगी आस्थापने अशा सर्व ठिकाणी पुणेकर आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचे छायाचित्र पाठवावेत. यात सर्वांनी सहभागी होत, विश्वविक्रमासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संयोजक राजेश पांडे आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे. शहरातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या उपक्रमातून विश्वविक्रम होणार असून, ४२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या फोटोंच्या सहाय्याने शांतता.. पुणेकर वाचत आहेत, हे वाक्य तयार करण्यात येईल. पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र पुणे पुस्तक महोत्सवाच्या https://photoupload.pbf25.in या वेबसाइटवर अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी आणि फोटो अपलोड करता येईल. या संपूर्ण उपक्रमाची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाच्या सोशल मीडिया हँडलवर मिळेल. त्यामुळे हँडलला भेट देण्याचे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.